अमित ठाकरेंच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल क्षत्रिय मराठा फाउंडेशनने तीव्र निषेध नोंदवला.
नवी मुंबईतील नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे गेल्या 6 महिन्यांपासून पालिकेने अनावरण केले नव्हते. खराब कपड्यांमध्ये बंदीस्त असलेल्या पुतळ्याचे रविवारी (16 नोव्हेंबर) मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अचानक अनावरण केले. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुध्दा झाली होती. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ आता राज्यातील क्षत्रिय मराठा फाउंडेशन मैदानात उतरले आहे. अमित ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल क्षत्रिय मराठा फाउंडेशनने तीव्र निषेध नोंदवला आहे. अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ आज क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष संभाजी शिर्के आज अमित ठाकरे यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहेत.
संभाजी शिर्के (Sambhaji Shirke) यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं की, अमित ठाकरे यांनी अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे अनावरण केले, यावरून माझा थेट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरता मंत्र्यांना वेळ नसेल आणि अमित ठाकरे यांनी त्या पुतळ्यावरचा मळलेला आणि धुळखात पडलेलं कापड जर हटवला असेल, आणि जर ते पुतळ्याचे अनावरण करत असतील तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा गुन्हा आहे का? हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. अमित ठाकरे यांनी केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर केलेले गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजेत, याचा मी जाहीर निषेध करतो, अमित ठाकरे यांनी केलेल्या कार्याचं आम्ही कौतुक करतो, या संदर्भामध्ये आम्ही अमित ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेणार आहे, त्यांचं कौतुक करणार आहे, आणि त्यांचं अभिनंदन करणार आहे. क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष विजय मोहिते यांच्यासह आम्ही सर्वजण अमित ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचा कौतुक आणि सत्कार करणार आहे, असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.




