पिडित अल्पवयीन मुलीला शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले.
पुणे (Pune) जिल्ह्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.16 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. सात वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली.अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या माहितीनुसार, देवीदास रोहीदास गर्जे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा अहिल्यानगरचा असून तो सध्या पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील नेतवडचा रहिवासी आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना एल.जी. थाटे यांनी सांगितले की,ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक सात वर्षीय अल्पवयीन मुलगी घराजवळ खेळत असताना,आरोपी देवीदास गर्जे याने रविवारी सायंकाळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.ओतूर पोलिसांनी या घटनेची त्वरित तक्रार दाखल करून आरोपीला अटक केली असून, पीडित अल्पवयीन मुलीला पुणे येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे हे करीत आहेत.




