स्पिन ट्रॅकच्या मागणीनं दिला उलट फटका; “पीच नव्हे, आपल्या गोलंदाजांवर विश्वास ठेवा” – सौरव गांगुली
कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडिया अनपेक्षितरीत्या 30 धावांनी पराभूत झाली आणि फक्त तीन दिवसांत सामना संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. ईडन गार्डन्सच्या पीचवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भारतीय संघाच्या स्पिन ताकदीबद्दलही नवे प्रश्न उभे राहिले.
भारतीय संघाने मागणीनुसार मिळालेल्या या स्पिन-अनुकूल पीचवरच भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही अपयश अनुभवले. या सगळ्यावर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली.
गांगुली (Sourav Ganguly)म्हणाले की घरच्या मैदानावर वर्चस्व मिळवण्यासाठी पीचशी अत्याधिक छेडछाड करणे थांबवले पाहिजे. त्यांना वाटते की टेस्ट क्रिकेटमध्ये पीच अशी असावी जिथे फलंदाजांना मोठी धावसंख्या करता येईल आणि एकाच वेळी गोलंदाजांनाही विकेट घेण्याची संधी मिळेल. “350 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात आणि तरीही गोलंदाज खेळात राहू शकतात, अशी विकेट असते ती खरी टेस्ट विकेट,” असे त्यांचे मत.
याचबरोबर त्यांनी गौतम गंभीरलाही (Gautam Gambhir)थेट संदेश दिला “मला आशा आहे गंभीर माझं ऐकतोय. पीच बदलण्यापेक्षा आपल्या बॉलिंग अटॅकवर विश्वास ठेवा.”
गांगुलींच्या म्हणण्यानुसार बुमराह आणि सिराज उत्कृष्ट काम करत असले तरी मोहम्मद शमीचा अनुभव आणि क्षमता टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी अमूल्य आहे. कोलकाता टेस्टनंतर पत्रकार परिषदेत गंभीरने मात्र पीचच्या निर्णयाचे समर्थन केले. “जशी मागणी केली तशीच पीच होती. क्यूरेटरची मदत मिळाली. आम्ही चांगलं खेळलो नाही, म्हणून हरलो. 124 धावांचा पाठलाग करता यायला हवा होता,” असा त्याचा दावा.
तरीही वास्तव वेगळंच सांगतं भारताचा स्पिन ट्रॅकवर अवलंबून राहण्याचा प्रयोग पुन्हा एकदा फसला. अगदी 2024 मधील न्यूझीलंड मालिकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.




