ब्रेक फेल झालेल्या ट्रकने उडवली वाहनांची साखळी; कार आणि कंटेनरला पेट, मृतांची संख्या वाढण्याची भीती
पुण्यातील नवले पुलावर काल (13 नोव्हेंबर) संध्याकाळी एक दिल दहाडणारी दुर्घटना घडली. साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एका ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित ट्रकने सुमारे 20 ते 25 वाहनांना जोरदार धडक दिली आणि क्षणात महामार्गावर हाहाकार उडाला.
सेल्फी पॉइंटजवळ उभ्या असलेल्या एका टुरिस्ट कारला कंटेनरने मागून ठोकर दिल्याने कार पुढील कंटेनरमध्ये अडकली. या भीषण साखळी धडकेनंतर कारने क्षणात पेट घेतला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा जागीच जळून मृत्यू झाला. कंटेनरचा चालक आणि क्लीनर हेही आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले.
अग्निशमन दल पाच ते सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत कार आणि कंटेनरचे फक्त सांगाडे उरले होते. जखमींवर उपचार सुरू असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवले पुलावर यापूर्वीही असे अनेक अपघात झाल्यामुळे सुरक्षा उपाययोजनांबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.




