नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई
पुणे (Pune) जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खोडद ( ता.जुन्नर ) येथे बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर म्हणाले की,राज्यातील आगामी पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अग्नीशस्त्रे संबंधी कारवाई करण्याच्या पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून जितेंद्र पानमंद (वय 35) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. जितेंद्रच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा पोलिसांना मिळाला. हा गावठी कट्टा जितेंद्रने उत्तर प्रदेश येथील पप्पू निसाद याच्याकडून घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात जितेंद्र रोहीदास पानमंद (वय 35,रा.खोडद, ता.जुन्नर) यांच्यासह पप्पू निसाद (वय 28, रा.खोडद, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी हा गावठी कट्टा (Gavathi Katta) जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दीपक साबळे,पोलीस हवालदार संदीप वारे,पोलीस हवालदार राजु मोमीन,पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे.




