घरफोडी करणारा चोराला पोलीसांनी घडवली अद्दल
दिवाळी सणाच्या (Diwali festival) सुरूवातीस जुन्नरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. 14 ऑक्टोबर रोजी पुण्यातील जुन्नर येथील वैभवलक्ष्मी सोसायटीत राहणारे 62 वर्षीय विष्णू भागुजी सांगडे हे राहत्या घराला कुलूप लावून काकड आरतीसाठी नारायणगाव येथील मंदीरात गेले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडले.चोराने बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोने-चांदीचे दागिने, अशी एकूण 11 लाख 20 हजार रूपयांची चोरी केली. विष्णू सांगडे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसांत याची तक्रार दाखल केली. आरोपी विरोधात नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नारायणगाव पोलिस स्थानकातील पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली चोराचा तपास सुरू झाला. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या मोटार सायकलवरील संशयितांचा पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित मोटार सायकल ही पुण्यातील विशाल तांदळे याची आहे. तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, नारायणगाव परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे (वय 28 वर्षे) मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून पोलिसांनी 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 841 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल असा एकूण 14,37,950 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विशाल तांदळे हा रेकॉर्डवरील सराईत चोर असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि प्रविण सपांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महोदव शेलार,पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोसई सोमन्बर शेटे, पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांनी केली आहे.




