11 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकत रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास
मेघालयच्या आकाश चौधरीने (Aakash Chaudhary) सर्वात जलद अर्धशतक ठोकून इतिहास रचला आहे. त्याने आठ चेंडूंमध्ये सलग आठ षटकारही मारलेत. मात्र यामागे आकाशचा अनेक वर्षांचा संघर्षमय प्रवास, जिद्द आणि खडतर परिश्रम आहे. रणजी ट्राॅफीचे सामने सध्या सुरु आहेत. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅच सूरतच्या पिठवाला स्टेडियमवर झाली.या सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीने इतिहास रचला, चौधरीने अवघ्या आठ चेंडूत षटकार मारून विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.मेघालयचा स्टार फलंदाज राहुल दलाल 102 चेंडूत 144 धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि आकाश कुमार चौधरी मैदानात आला. त्याने पहिला चेंडू डॉट म्हणून खेळला आणि पुढच्या दोन चेंडूंवर एकेरी धाव घेतली. त्यानंतर, गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या लिमार डाबीच्या एका षटकात त्याने सहा षटकार मारले. त्यानंतरही, तो थांबला नाही आणि पुढच्या दोन चेंडूंवर एक षटकार मारला, ज्यामुळे त्याने फक्त 11 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. आकाशने विस्फोटक खेळी करत मेघालयला 600 पार पोहोचवण्यात मदत केली. मेघायलयने पहिला डाव हा 628 धावांवर घोषित केला.आकाशने यात 50 धावांचं योगदान दिलं. आकाशने 14 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. त्याने अर्धशतक करताच 13 वर्षांआधीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. आकाश कुमारपूर्वीचा रेकॉर्ड इंग्लंडचा वेन व्हाईटच्या नावावर होता, ज्याने 2012 मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना एसेक्सविरुद्ध 12 बॉलमध्ये फिफ्टी मारली होती.आकाशच्या या धमाकेदार बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
यासोबतच आकाश कुमार चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ 8 षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर लागोपाठ 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत सर गॅरी सोबर्स हे अव्वल स्थानी आहेत. गॅरी सोबर्स यांनी 1968 मध्ये नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळताना ग्लेमॉर्गन संघाविरूद्ध खेळताना लागोपाठ 6 चेंडूंवर 6 षटकार मारले होते.तर भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. रवी शास्त्री यांनी 1985 मध्ये मुंबईकडून खेळताना लागोपाठ 6 षटकार खेचले होते.
25 वर्षीय आकाश हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो.त्याचे वडील वेल्डर आहेत.आकाशने केंद्रीय विद्यालय शिलाँगमध्ये (Shillong) शिक्षण घेतले आणि तो शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आहे. आकाशचे कुटुंब मूळचे बिहारचे असले तरी, तो आता मेघालयाचा रहिवासी आहे. आकाश कुमारने 2019 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने मेघालयकडून नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तो सिक्कीमविरुद्ध लिस्ट ए सामने आणि गुजरातविरुद्ध टी-20 सामनेही खेळला. एवढंच नाही तर आकाश मिडियम पेसर बॉलिंग देखील करतो.आकाशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने एकूण 30 प्रथम श्रेणी सामने, 28 लिस्ट ए सामने आणि 30 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, आकाशने 500 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. तर आकाशने लिस्ट ए सामन्यांमध्ये 203 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 28 विकेट्स आहेत. त्यामुळे गंभीरला हवा तसा खेळाडू आयपीएल ऑक्शनमध्ये झळकणार का? असा सवाल विचारला जात आहे. आयपीएलमध्ये आकाशवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.




