कोट्यावधींचा घोटाळा आरोपी कोण ?
पुण्यातील मुंढवा येथील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले. आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच महार वतनाच्या जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी असलेल्या शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानीचा अशा प्रकारचा कारनामा नवा नाही. तिने अनेकांकडून सरकारी जमिनी विकून देण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी मिळवलेली आहे. तिच्या पतीचा इतिहासही असाच आहे. मुंढवा जमीन प्रकरणातून चर्चेत आलेली शीतल तेजवानी आणि अमेडीया कंपनीत केवळ 1 टक्का भागीदारी असताना गुन्हा दाखल झालेला दिग्विजय पाटील नेमके कोण आहेत, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीत एक टक्के भागीदारी असूनही दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. 25 वर्षीय दिग्विजय पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे भाचे आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे पुण्यातील शिवाजीनगर येथील एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असलेल्या तीन एलएलपीमध्ये संचालक आहेत.दिग्विजय यांचे वडील अमरसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे सख्खे भाऊ.अमरसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावाचे सरपंच होते. त्यांचे 2020 साली निधन झाले. मृत्यूच्या 10 ते 15 वर्षांपूर्वी अमरसिंह पाटील तेरहून पुण्यात स्थायिक झाले होते. राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे ते सावत्र बंधू होते.
“अमरसिंह पाटील हे अधूनमधून गावी तेरला येत असत पण दिग्विजय फारसे गावाला आलेले नाहीत. दिग्विजय हा स्वभावाने खूप शांत मुलगा आहे. तो कुणाशीही जास्त संवाद साधत नाही. माझ्या अंदाजानुसार अमरसिंह यांच्या वडिलांची तेरमध्ये 200-300 एकर शेती आहे. अमरसिंह राजकारणापासून दूर राहिले. ते अधूनमधून बहीण सुनेत्राची भेट घ्यायला जात असत”, अशीही माहिती त्यांच्या मित्राने दिली. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एलएलपी, अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी आणि अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या तीन कंपन्यांचे संचालक आहेत. याव्यतिरिक्त पाटील हे डीव्हीजे इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीची स्थापना 2020 मध्ये झाली तर अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीची स्थापना 2021 मध्ये झाली. तर महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एलएलपीची स्थापना याच वर्षी मे महिन्यात झाली.
याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांच्यावर फसवणुकीचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 2018 साली सेवा विकास बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांचे पती सागर सूर्यवंशी आणि तेजवानी यांच्याविरुद्ध पुण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 2020 मध्ये, सेवा विकास सहकारी बँकेने सूर्यवंशी, तेजवानी आणि या प्रकरणात इतरांशी संबंधित असलेल्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या. कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात महार वतनाच्या मूळ शेतकऱ्यांनी तेजवानी यांना जमिनीचे व्यवहार करण्यासाठी कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटॉर्नी) दिले होते. त्यामुळे तेजवानी यांनी या जमिनीची खरेदी लिहून दिली. अमेडिया एलएलपी कंपनीतर्फे दिग्विजय पाटील यांनी ही जमीन लिहून घेतली. शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांच्यावर 100 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज त्यांनी महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी, काही कंपन्यात गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले आहे. पण, ते परत फेडण्यास त्यांनी टाळाटाळ केली. शीतल ही महार वतनाच्या किंवा वादात असलेल्या सरकारी जमिनी विकासकांना मिळवून देण्याचा गोरखधंदा करते. आता अमेडीयाचा व्यवहार रद्द झाल्याचे अजित पवार सांगत असले तरी ९९ टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांना क्लीन चिट देणं हा सत्तेच्या गैरवापराला लोकमान्यता देण्याचाच प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं, यावर हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.




