प्रवाशांच्या मृत्यूंची जबाबदारी कुणाची?
9 जून2025 रोजी मुंब्रा स्थानकाजवळ (Mumbai Railway Accident) झालेल्या अपघातात लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर नऊ जण जखमी झाले होते. रेल्वे पोलिसांच्या अहवालात अपघातासाठी वरिष्ठ सेक्शन अभियंता आणि सहायक विभागीय विद्युत अभियंता यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांचा हा आरोप अन्यायकारक आणि निराधार असून, या दुर्घटनेशी रेल्वे कर्मचार्यांचा काही सहभाग नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावरून रेल्वे संघटनांनी, मध्य रेल्वे मजदूर संघाने 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यांची माहिती बर्याचशा प्रवाशांना नव्हती. संध्याकाळी पाच वाजता कर्मचार्यांनी काम बंद करून आंदोलनाला सुरुवात केली. कर्मचार्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या दिला. मोटरमनही या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एकही गाडी सुटली नाही. जवळजवळ तासभर लोकल सेवा बंद होती.त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी जाणार्यांचे हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सगळ्याच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. संध्याकाळी साडेसहा वाजता अभियंत्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.तोपर्यंत प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळली होती. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल सेवा तीस-ते चाळीस मिनिटे उशिरा धावत होती. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नव्हते. प्रवासी अर्धा ते एक तास स्थानकांवर लोकलची वाट पाहत राहिले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून पायी जाणे पसंत केले. काही प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रुळावरून चालत होते.त्याचवेळी हे आंदोलन मागे घेतल्यानंतर सुटलेल्या अंबरनाथ जलद लोकलने रुळावर 4 प्रवाशांना उडवल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला,तर एक प्रवासी जखमी झाला.
6 नोव्हेंबर हा दिवस मुंबईल लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांसाठी शेवटचा दिवस ठरला.मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात 3 प्रवाशांनी आपला जीव गमावलाय.आंदोलनामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक टप्प झाली.लोकलसेवा बंद असल्याने सँडहर्स्ट स्टेशनच्या रेल्वे पटरीवरच काही प्रवासी पायी चालत होते.मात्र अचानक लोकल आली आणि जलद आलेल्या लोकलने या प्रवाशांना उडवले. ज्यात त्यांचा मृत्यू झालाय.या घटनेनांतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेला जबाबदार कोण ? रेल्वे प्रशासन की आंदोलन करणारे रेल्वेचे कर्मचारी. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या होत्या ? त्याआधी 6 नोव्हेंबरला घडलेल्या घटनेचा घटनाक्रम थोडक्यात जाणून घेऊयात.
मृत्यू झालेल्यांमध्ये 19 वर्षीय हेली मोहमाया हिचा समावेश आहे. हेली फ्लोरा फाउंटनला परत येत असताना तिच्यासोबात ही दुर्घटना घडली.जखमींमध्ये हेलीची 45 वर्षीय काकू खुशबू मोहमाया यांचाही समावेश होता. त्यांना सायंकाळी साडे सातच्या सुमारास सर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.दुसऱ्या मृताचीही ओळख पटली या अपघातात मृत्यू झालेल्या दुसऱ्या मृताची ओळख 45 वर्षीय सूर्यकांत नाईक अशी झाली आहे, ते मीरा रोड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर तिसऱ्या मृताची ओळख अजून पटलेली नाही.तर जखमी झालेल्यामध्ये (62) वर्षीय याफिजा चोगले या महिलेचा समावेश आहे.
या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आलाय. संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज असताना, रेल्वेने आंदोलनाविषयी प्रवाशांना माहिती देणे गरजेचे होते.मुंबईत रेल्वे अपघाताच्या घटना या मुंबईकरांसाठी नवीन नाहीत पण यात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे काय होत असेल ? याचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत.अनेकदा सांगितले जाते की रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करू नका. तरीसुद्ध काही प्रवाशी आपला जीव धोक्यात घालतातच. त्यामुळेच असे प्रसंग घडतात.




