राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच (Local Body Elections) वारं वाहतंय. राजकीय पक्षांनी यासाठी जय्यद तयारी सुरू केली आहे. निवडणुकांसाठी अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत. 31 जानेवारीपर्यंत न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अजून निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नसून अशातच आता महायुतीच्या एका दिग्गज नेत्याने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
राज्यातील सर्वच पक्ष जोशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत मग्नआहेत. अशातच आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहे. या तारखा जाहीर करताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर करताना असे सांगितले, ‘या तारखा मी जाहीर करत नाही, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे परंतु आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर पर्यंत नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल.
पुढे बोलताना वळसे पाटील असे हि म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे.’ मंचर येथील युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे. त्या दरम्यान, वळसे पाटलांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते.




