spot_img

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा एल्गार! बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे रवाना

spot_img

साडेबारा वाजेपर्यंत १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण; सुकळी बाई गावात शेतकऱ्यांची विश्रांती आज नागपूरात सरकारला जाब विचारण्यासाठी महा एल्गार सभा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाने आंदोलनाचा जोर वाढवला आहे. तब्बल १२ तासांचा आणि सुमारे १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हा मोर्चा काल रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई गावात दाखल झाला. शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह आणि जनतेचा मोठा पाठिंबा पाहता आज हा मोर्चा नागपूरकडे कूच झाला असून, तेथे ‘महा एल्गार सभा’ घेऊन सरकारला थेट जाब विचारण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “काल आम्ही १५० किलोमीटरचा प्रवास केला. जात-पात विसरून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली आहे आणि मागण्या स्पष्ट केल्या आहेत. पण मी बैठकीला गेलो, तर दीड लाख शेतकरी मागे पडतील, त्यामुळे सरकारने आपला प्रतिनिधी आमच्याकडे पाठवावा,” असे ते म्हणाले.

कडू यांनी सरकारकडे मागणी केली की, निर्णय फक्त चर्चेत न राहता लेखी स्वरूपात, परिपत्रकाद्वारे द्यावेत. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तातडीने रद्द करावा आणि केवळ ६ हजार कोटींच्या पॅकेजवर फसवाफसवी करू नये. शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही, हे सरकारचं अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी कडू यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधत म्हटले, “तुमच्या धोरणामुळे मेण्यापेक्षा रस्त्यावर येऊन मेलो तरी चालेल. ट्रॅक्टर मोर्चासाठी आम्हाला परवानगी नाकारली आहे, पण नवरदेवाला घोड्यावर बसण्यासाठी परवानगी लागते का? पोलिसांच्या हातातच आता भाजपचा झेंडा द्यावा लागेल!” असा टोला त्यांनी लगावला.

रात्री साडेबारा वाजता सुकळी बाई गावात पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी बेसन भाकरीचं जेवण घेतलं आणि हनुमान मंदिरात जमिनीवरच गाद्या टाकून विश्रांती घेतली. आज पहाटेपासूनच शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी नागपूरकडे निघाले आहेत.

“ऊन, वारा, पाऊस काहीही असो शेतकरी मागे हटणार नाही,” असा ठाम निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमधील महा एल्गार सभेला राज्यभरातील शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ