पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीपूर्वी शिंदेंचे दिल्लीत दौरे, राऊत म्हणाले, ‘मालकांचा आदेश, भाजपात विलीन होण्याचा सल्ला’
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटींवर तिखट शब्दांत टीका केली आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा शिंदे गटाची पावले दिल्लीच्या दिशेने वळतात. “प्रादेशिक पक्षांचे मुख्यालय हे राज्यात असते, दिल्लीत नाही. पण यांचे खरे मालक दिल्लीत आहेत, त्यामुळे त्यांना तिथे धाव घ्यावी लागते,” असा टोमणा राऊत यांनी मारला.
राऊत यांनी पुढे एक मोठा दावा केला की, शिंदे गटाला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी महापालिका निवडणुकांनंतर शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. “शिंदेंची जमिनीवरील ताकद किती आहे, हे मोदी आणि शाहांना चांगलेच माहीत आहे. त्यांनी शिंदेंचा वापर आमच्याविरुद्ध आणि महाराष्ट्राविरुद्ध केला. पण आता त्यांना पक्ष विलीन करण्याचे सुचवले आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांनी असा आरोपही केला की, शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयात आपला बचाव करणे शक्य नाही, कारण कोणत्याही कायदेशीर आधारावर ते टिकणार नाही. अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळू शकतो, असेही ते म्हणाले.
राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेच्या या प्रकरणामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीबद्दल जगभरात शंका निर्माण झाल्या आहेत. “शिंदे लटपटलेल्या अवस्थेत दिल्लीला धाव घेतात, अमित शाहांसमोर रडतात, छाती पिटतात आणि परत येतात,” असा खोचक टोला राऊतांनी लगावला. शिंदे गटाच्या दिल्ली दौऱ्यांमागे पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीशी संबंधित दबाव असल्याचे राऊत यांनी सुचवले.




