मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याला दोन्ही नेत्यांची उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
मंगळवेढा, 26 ऑक्टोबर: येत्या रविवारी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा अनावरण सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) प्रथमच एकाच मंचावर दिसणार आहेत. या ऐतिहासिक क्षणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्साह आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.हा भव्यदिव्य सोहळा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केला आहे. त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना विशेष निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे.” या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचेही अवताडे यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे हा सोहळा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी म्हटले, “मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही या सोहळ्याला येण्याचा निर्णय घेतला.” यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट टाळली होती, कारण ओबीसी समाजाची नाराजी टाळण्यासाठी सरकारने सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि सर्व समाजाचे दैवत असल्याने हा सोहळा सर्वसमावेशक असेल, अशी अपेक्षा आहे. 26 ऑक्टोबरला होणाऱ्या या सोहळ्यात जरांगे आणि फडणवीस खरोखरच एकत्र दिसणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




