भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकत्याच झालेल्या भंडाऱ्याच्या सभेत कार्यकर्त्यांना धक्का देणारी वक्तव्य केली. पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन देताना त्यांनी सांगितले की, पक्षात एकही बंडखोरी सहन केली जाणार नाही. जर एखाद्या कार्यकर्त्याने चूक केली किंवा चुकीचं बटन दाबलं, तर सगळ्यांचा नाश होईल! आणि याबाबत सावधान करण्यासाठी ते म्हणाले, “तुमचे सर्व मोबाइल फोन आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्स आमच्या सर्व्हिलन्स रडारवर आहेत. कोण काय बोलतंय, कोणाशी काय संवाद साधतोय, ते सगळं आम्हाला माहिती आहे.”या विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघालंय.
बावनकुळे यांच्या या बोलण्याने फोन टॅपिंगचा संशय वाढला असून, शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर तीव्र पवित्रा घेतला. राऊत म्हणाले, “हे अत्यंत बेकायदेशीर आणि घटनाविरोधी कृत्य आहे. इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार बावनकुळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची अटक करावी आणि चौकशी करावी.” त्यांनी हेही आरोप केले की, हे सर्व्हिलन्स फक्त भाजप कार्यकर्त्यांपुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही लागू आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गटातील राष्ट्रवादी, काँग्रेससह शिंदे-फडणवीस (Shinde – Fadnavis) गटातील नेत्यांचेही फोन आणि व्हॉट्सअॅप संवाद ट्रॅक केले जात आहेत.
राऊत यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला की, बावनकुळे आणि त्यांच्या भाजप टीमसह रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), मुंबईतील काही भाजपशी जोडलेले बिल्डर आणि नागपूरमधील यंत्रणा एकत्र येऊन एक खासगी ‘वॉर रूम’ उघडली आहे. यातून पेगॅसिससारखं स्पायवेअर वापरून सर्वांचे खासगी जीवनात शिरकाई केली जातेय. हे सर्व खाजगी आणि बेकायदेशीर असून, लोकशाहीवर हल्ला आहे, असं राऊत म्हणाले. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापदायक होण्याची शक्यता आहे, आणि आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा मोठा वादग्रस्त ठरू शकतो.




