महाराष्ट्रात ओला दुष्काळाने शेतकरी संकटात सापडला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि केंद्रातील डबल इंजिन सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही, तर धनदांडग्यांचे हित जोपासणारे आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. माझगाव क्रिकेट क्लबच्या नावावरून सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी ताशेरे ओढले. सरकारने सत्तेचा गैरवापर करून क्लबचे नाव रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायव्यवस्थेकडे दाद मागू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्यात ओला दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, सरकार नियमांचा बडगा दाखवत आहे.
विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, पण आता सत्तेत असताना ते नियमांचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना मदत करण्यात टाळाटाळ करत असल्याचा पटोलेंचा आरोप आहे. केंद्र सरकारही मोठ्या मदतीचे दावे करते, पण प्रत्यक्षात शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांसाठी हे डबल इंजिन सरकार अपयशी ठरत आहे. धनदांडग्यांसाठी मात्र हे सरकार झटपट धावते, मग हे सरकार खरंच कोणाचे आहे, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.महाराष्ट्राची दुरवस्था करणारे हे सरकार आहे, असे सांगत पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या साडेचार वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.
सुप्रीम कोर्टाच्या 31 जानेवारीच्या अंतिम मुदतीमुळे आता निवडणुका होत आहेत. या सरकारच्या लूटमार आणि भ्रष्टाचाराला जनतेने आता आवर घालायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. पैशाच्या जोरावर मते विकत घेऊन आणि मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवण्याची या सरकारची मानसिकता आहे, असा घणाघात त्यांनी केला.माझगाव क्रिकेट क्लबच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्ही एमसीएच्या सर्व नियमांचे पालन केले आहे. आमचे नाव रद्द होऊ शकत नाही. क्रिकेट आता राजकारणाचा अड्डा बनले आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून आमचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मला विश्वास आहे की, न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल.” सरकारच्या या कथित दडपशाहीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी ठणकावले.या दिवाळीच्या मुहूर्तावर, महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला जाब विचारावा आणि त्यांचे खरे स्वरूप उघड करावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.




