मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना घाई करण्याची आवश्यकता नाही. सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असून, या कालावधीत पात्र लाभार्थींना प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी न झालेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अदिती तटकरे यांच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र काही तांत्रिक किंवा कागदपत्रांशी संबंधित त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनाही त्या दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना केवळ ई-केवायसीच्या अडचणीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील मासिक हप्ता वाढवण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही तटकरे यांनी सांगितले. सध्या सरकारचा भर योजना प्रभावीपणे राबवण्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी लोकशाहीत नागरिकांना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असून, शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.




