मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्र्यांनी सुपूर्द केले अधिकृत पत्र; DoPT विधेयक संसदेत मांडण्याचे व चर्चेचे आश्वासन
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आपले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. केंद्र सरकार आणि वांगचुक यांच्यात झालेल्या सकारात्मक व उच्चस्तरीय चर्चेनंतर उपोषण सोडण्याचा हा मार्ग मोकळा झाला. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे चार तास प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सरकारतर्फे आश्वासनाचे अधिकृत पत्र त्यांच्या स्वाधीन केले. ‘कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा’च्या (DoPT) अंतर्गत प्रस्तावित असलेले नवीन विधेयक आगामी आठवड्यात संसदेत सादर केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच आंदोलक प्रतिनिधींसोबत तटस्थ ठिकाणी औपचारिक चर्चा आयोजित करण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे.
सरकारच्या या भूमिकेनंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. लवकरच लडाखला परतण्यापूर्वी ते आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि समर्थकांची भेट घेऊन शांततापूर्ण मार्गाने संवाद सुरू ठेवण्याचे आवाहन करतील. कोणत्याही अफवांना वा चिथावणीला बळी न पडता लोकशाही मार्गाने चर्चा पुढे नेण्यावर वांगचुक यांनी भर दिला आहे.




