मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा तरुणाला धमकावल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी तरुणाला धमकावताना दिसत असून, “पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन,” असे कथित वक्तव्य करत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आल्याचे सांगितले. टॅक्सीमध्ये असलेल्या तरुणांना पोलीस अशा पद्धतीने धमकावत असल्याचे दिसत असल्याचा दावा करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
“५० ग्रॅमची पावडर टाकेन, असे म्हणणारा पोलीस स्वतः ड्रग्सशी संबंधित आहे का? पोलिसांकडे अशी पावडर कुठून आली?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण आणखी चर्चेत आले.
दरम्यान, व्हिडिओची दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे. पवन सांगळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही या प्रकरणी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर कारवाईसह उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या अधिकृत तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




