बँकेच्या व्याजातून आणि दातृत्ववान सदस्यांच्या सहकार्यातून आणे-माळशेज परिसरातील १० शाळांमधील विद्यार्थ्यांचा थेट घरपोहोच गौरव; ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण.
ग्रामीण भागातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हुरूप व प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘बॉर्डरलेस फाऊंडेशन’च्या वतीने एक अत्यंत अभिनव आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. समूहाच्या बँक ठेवींचे व्याजरूपी संचित आणि दातृत्ववान सदस्यांच्या आर्थिक सहकार्यातून आणे-माळशेज परिसरातील तब्बल दहा शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष प्राविण्य प्रशस्तिपत्रक आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठीची आर्थिक मदत देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, फाऊंडेशनचे प्रमुख आणि कार्यकर्ते पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन न करता थेट विद्यार्थ्यांच्या घरी गेले आणि पालकांच्या उपस्थितीत हा सन्मान पूर्ण केला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा असल्याचे पाहून पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व भारावल्याचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमांतर्गत अक्षदा पंढरीनाथ ढेम्बरे (गाडगे महाराज विद्यालय ओतूर), रूपाली सुखदेव केदार (चैतन्य विद्यालय ओतूर), ज्ञानेश्वरी नवनाथ डगळे (सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर), विघ्नेश संतोष शिंदे (सरस्वती विद्यालय उदापूर), अनुष्का दत्तात्रय हांडे (संत गाडगे महाराज कलानिकेतन, पिंपळगाव जोगा), यज्ञा अनिल केम्बारी (भाऊसाहेब बोरा आणि माळशेज विद्यालय मढ), आरूषी अशोक वाळूंज (श्रीमती रेऊबाई देवकर विद्यालय वडगाव आनंद), दुर्वा संजय लंबे (शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण), आविष्कार सुनील खंडागळे (वीर सावरकर विद्यालय पांगरी माथा) आणि पल्लवी मनोहर पारधी (पुष्पवती विद्यालय डिंगोरे) या १० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी बॉर्डरलेस फाऊंडेशनचे प्रमुख देविदास तांबे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनासह शैक्षणिक कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या लोकोपयोगी उपक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एक नवी दिशा दिली असून, या सामाजिक कार्याची सर्वत्र जोरदार प्रशंसा होत आहे.




