राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान करत विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची सध्या कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंच्या अटी आणि शर्ती परस्परांना मान्य नसल्याने विलिनीकरणाचा निर्णय होणे कठीण असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दिल्लीत यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याचे दावेही करण्यात आले होते. दोन्ही गट एकत्र आल्यास सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी सांभाळतील, तर सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील राजकीय कामकाज पाहतील, अशा चर्चांनाही उधाण आले होते.
मात्र, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वतंत्रपणे इतर पक्षांमध्ये विलीन होण्याची शक्यता असू शकते, पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे चित्र सध्या दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या पाहणीनंतर शिरसाट यांनी विकासकामांच्या दर्जावरही नाराजी व्यक्त केली. सुमारे 14 कोटी रुपयांच्या कामांमध्ये अपेक्षित गुणवत्ता दिसून आली नसल्याचे सांगत त्यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करत त्यांनी “आधी स्वतःच्या पक्षाची रक्षा करा,” असा टोला लगावला. शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा राजकीय रंग चढला आहे.




