लोकल आणि स्टेशनवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; रेल्वे पोलिसांनी संशयित माथेफिरूला घेतले ताब्यात
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाची झालेली हत्या आणि त्यानंतर प्रवाशांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांची शाई वाळते न वाळते, तोच आता मध्य रेल्वेवरील अतिशय वर्दळीचे स्थानक असलेल्या कुर्ला रेल्वे स्टेशनवरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ला स्थानकावर एका इसमाने प्रवाशांना धमकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकावर एक जण हातात लोखंडी रॉडसारखी वस्तू घेऊन कल्याणच्या दिशेने धावत असल्याचे काही प्रवाशांनी पाहिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच पळापळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ हालचाल केली आणि त्या संशयित व्यक्तीला जागीच पकडून ताब्यात घेतले. सध्या हा आरोपी जीआरपी (GRP) कुर्ला पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या व्यक्तीने आपले नाव साजिद अब्दुल करीम चौधरी (वय ४९ वर्षे) असल्याचे सांगितले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्राथमिक तपासानुसार या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे आढळून आले आहे. तसेच, सोशल मीडियावर दावा केल्याप्रमाणे त्याच्या हातात कोणतीही लोखंडी वस्तू किंवा रॉड नव्हता, तर ती झाडाची एक तुटलेली काठी होती, असे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
भलेही या घटनेतील व्यक्ती माथेफिरू निघाली असली आणि त्याच्या हातात काठी असली, तरी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांमधील भीती कमी झालेली नाही. या माथेफिरूवर आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस नक्की काय ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




