Thane : ठाण्यात जुन्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला; महिला आणि दोन बालकांसह तिघे जखमी

spot_img

ठाण्यातील आझाद नगर परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक दुर्घटना घडली. मद्रास चाळीतील सुमारे 25 ते 30 वर्षे जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन लहान मुले जखमी झाली असून, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य करत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींमध्ये उर्मिला जैस्वाल (30), जयकुमार जैस्वाल (10) आणि विनीतकुमार जैस्वाल (8) यांचा समावेश आहे. तिघांनाही तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीच्या बांधकामावर परिणाम झाला आणि त्यामुळे गॅलरीचा भाग कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रभाग समितीचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून इमारतीच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच इमारतीतील इतर रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या घटनेनंतर जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पावसाळ्यात अशा इमारतींची नियमित तपासणी आणि वेळेत दुरुस्ती करण्याची गरज अधोरेखित होत आहे. प्रशासनाकडून या दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, पुढील अहवालानुसार आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ