पुणे शहरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथित गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनंतर पुणे पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, पोलीस दलाच्या प्रतिमेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी मध्यरात्रीनंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे त्यांच्या रात्रीच्या गस्तीवर होते. पहाटेच्या सुमारास ते शिरोळे रोड परिसरातील एका कॅफेमध्ये पोहोचले. त्यावेळी संबंधित कॅफेमध्ये बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदीप कदम हातात काठी घेऊन कॅफेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी काउंटरजवळ ठेवलेल्या वस्तूंवर काठीने प्रहार करत नुकसान केल्याचे फुटेजमध्ये दिसून येते.
याशिवाय, कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांना तातडीने बाहेर जाण्यास सांगितल्याचे आणि कर्मचाऱ्यांशीही आक्रमक व अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कॅफेमध्ये उपस्थित ग्राहक आणि कर्मचारी भयभीत झाल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली असून, पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.




