Chandrapur : चंद्रपूर बाळ विक्री प्रकरणात मोठा खुलासा; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

spot_img

चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान या दोन्ही महिलांचा नवजात बालकांच्या अवैध विक्रीच्या साखळीत महत्त्वाचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालयाने दोन्ही आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा उलगडा मे महिन्यात झाला होता. एका महिलेने स्वतःच्या दोन मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पुढील चौकशीत आणखी एक गंभीर बाब उघड झाली. अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची विक्री करण्याची तयारी तिच्या आईकडून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान, ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि अनैतिक संबंधांतून जन्माला आलेल्या नवजात बालकांची अवैध विक्री करणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात आतापर्यंत अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई, नवजात बालक खरेदी करणाऱ्या दोन महिलांसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर संभाव्य आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ