देशात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना नेत्रतज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास डोळ्यांच्या नैसर्गिक भिंगावर परिणाम होऊन मोतीबिंदू लवकर उद्भवतो आणि त्याची प्रगतीही वेगाने होते. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार आता चाळीशी-पन्नाशीतच मोतीबिंदू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून मधुमेह हे त्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या आकडेवारीनुसार भारतात 101 दशलक्षांहून अधिक प्रौढ मधुमेहग्रस्त असून आणखी मोठी लोकसंख्या पूर्व-मधुमेह अवस्थेत आहे. तज्ज्ञांच्या मते डायबेटिक रेटिनोपॅथीसोबतच मोतीबिंदूही मधुमेहाच्या गंभीर गुंतागुंतींपैकी एक बनत आहे, विशेषतः ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही अशा रुग्णांमध्ये हा धोका अधिक आहे.
कामकाजाच्या वयोगटातही मोतीबिंदूचे प्रमाण वाढत असून लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबासारखे आजारही याला हातभार लावत आहेत. संगणक, मोबाईल आणि डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे दृष्टीतील बदल लवकर लक्षात येतात, तर अंधुक दिसणे, प्रकाशाची संवेदनशीलता, कॉन्ट्रास्ट कमी होणे आणि वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात. तज्ज्ञांनी 40 वर्षांवरील आणि विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींना नियमित डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला दिला असून लवकर निदान आणि वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी टिकवणे शक्य असल्याचे सांगितले आहे.




