Alisha Lehmann Engaged : फुटबॉल स्टार अलिशा लेहमनचा साखरपुडा; समुद्रकिनारी रोमँटिक प्रपोजलने जिंकली चाहत्यांची मने

spot_img

स्वित्झर्लंडची प्रसिद्ध महिला फुटबॉलपटू आणि सोशल मीडिया स्टार अलिशा लेहमन हिने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अलिशाने प्रियकर मॉन्टेल मॅकेन्झीच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार देत साखरपुड्याची घोषणा केली आहे. समुद्रकिनारी सूर्यास्ताच्या साक्षीने झालेल्या या रोमँटिक प्रपोजलचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अलिशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये मॉन्टेल मॅकेन्झी गुडघ्यावर बसून तिला अंगठी घालताना दिसत आहे. या खास क्षणी अलिशा भावूक झाल्याचेही फोटोंमधून स्पष्टपणे जाणवते. काळ्या रंगाच्या आकर्षक पोशाखात दिसणाऱ्या अलिशाने फोटोसोबत कायम एकत्र राहण्याच्या भावनेने भरलेला संदेशही शेअर केला आहे. या रोमँटिक क्षणानंतर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अलिशा आणि मॉन्टेल यांनी यावर्षीच आपले नाते सार्वजनिक केले होते. बॉलर्स लीग स्पर्धेदरम्यान दोघांची ओळख झाली होती. त्या वेळी अलिशा संघ व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होती, तर मॉन्टेल स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. काही महिन्यांतच दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे या साखरपुड्यामुळे स्पष्ट झाले आहे.

याआधी अलिशाचे नाव ब्राझिलियन फुटबॉलपटू डग्लस लुईझसोबत चर्चेत होते. मात्र काही काळानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर अलिशाने आपल्या फुटबॉल कारकिर्दीवर आणि वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. मैदानावरील कामगिरीसोबतच सोशल मीडियावरील तिची लोकप्रियताही सातत्याने वाढत असून ती जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या महिला फुटबॉलपटूंमध्ये गणली जाते. आता तिच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ