बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या घटनेचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी सलग तीन दिवस रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मंगळवारी विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून तब्बल नऊ तास आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणात एका संशयिताने पुरवणी जबाबात एका लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव घेतल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र या संदर्भातील सर्व बाबींची पडताळणी तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.
घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आयपीएस अधिकारी वेंकटरामा यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपासाची सूत्रे हाताळत आहे. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून त्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे. दगड, काचेच्या बाटल्या आणि इतर वस्तूंचा वापर करून झालेल्या या संघर्षात अनेक जण सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये १३ ते १४ जण दिसत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित पुरावे आणि साक्षींची पडताळणी केली जात असून येत्या काही दिवसांत तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




