MNS On Rahul narvekar : राहुल नार्वेकरांच्या मराठी वाचनावरून मनसे आक्रमक; “मराठी येत नसेल तर ट्युशन लावा, खर्च आम्ही करू”, संदीप देशपांडेंचा बोचरा टोला

spot_img

मुंबईतील नालेसफाईच्या ‘नाटकांवरून’ मनसेचा प्रशासनावर हल्लाबोल; नाले तुंबल्याने अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

विधानसभा सभागृहात प्रसिद्ध दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या भाषिक चुकांमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच कोंडीत सापडले आहेत. मराठी भाषेची ‘चिरफाड’ केल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्यावर आधीच कडाडून टीका केली होती. यावर नार्वेकरांनी “प्रिंट अस्पष्ट आणि फॉन्ट लहान असल्याने चुका झाल्या” अशी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या या स्पष्टीकरणाचा खरपूस समाचार घेतला असून, “नार्वेकरांना फॉन्टचा नाही, तर मराठी वाचण्याचाच प्रॉब्लेम आहे. त्यांना मराठी येत नसेल तर त्यांनी खुशाल ट्युशन लावावी, त्याचा सर्व खर्च मनसे करेल,” असा उपरोधिक टोला लगावला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना देशपांडे म्हणाले की, जर खरोखरच कागदाचा फॉन्ट लहान होता, तर अध्यक्षांनी तिथेच थांबून तो बदलून घ्यायला हवा होता. लोकप्रतिनिधींना मराठी अनिवार्य करण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एका व्यक्तीच्या चुकीमुळे सर्वांना दोषी धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात मराठीचे चुकीचे उच्चार होणे अक्षम्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

“दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईच्या पाहणीचे जे नाटक रंगवले जाते, त्यानंतरही मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबणार असेल, तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे.” – संदीप देशपांडे

यासोबतच मुंबईत पहिल्याच पावसात उडालेल्या दाणादाणीवरून संदीप देशपांडे यांनी महापालिका प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नालेसफाईची केवळ नाटकं करण्यापेक्षा जिथे काम चालते तिथे थेट सीसीटीव्ही लावून घरातूनच देखरेख करण्याचा सोपा सल्ला त्यांनी दिला. कालच महापौरांसमोर एक अधिकारी उघड्या मॅनहोलमुळे नाल्यात पडल्याच्या घटनेचा दाखला देत, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई आणि जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत मुंबईकरांचे हे हाल थांबणार नाहीत, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्ष या निष्काळजी अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ