Saeed Khan : ‘आज मांडव माझ्या दारात, उद्या तुमच्या असेल…’; विजयानंतरही आमदार सईद खान यांचा महायुतीतील ‘गद्दार’ मित्रांना गर्भीत इशारा!

spot_img

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ६५ मते फुटल्याने नवनिर्वाचित आमदार आक्रमक; राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा पवित्रा

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवूनही शिवसेनेचे (शिंदे गट) नवनिर्वाचित आमदार सईद खान यांच्या मनातील संताप अनावर झाला आहे. “मला पाडण्यासाठी ज्यांनी सोबत राहून पाठीत खंजीर खुपसला, त्यांना मी अजिबात सोडणार नाही. आज मांडव माझ्या दारासमोर होता, उद्या तो तुमच्या दारासमोर असेल. आमची वेळ येईल तेव्हा प्रत्येकाचा हिशेब चुकता केला जाईल,” अशा कडक शब्दांत सईद खान यांनी महायुतीमधीलच दगाफटका करणाऱ्या नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचे नाव न घेता खान यांनी हा थेट हल्ला चढवला आहे.

या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता महायुतीचे पारडे अत्यंत जड होते. कागदावर महायुतीकडे तब्बल ३०७ मते असताना सईद खान यांना प्रत्यक्षात २४२ मते मिळाली, म्हणजेच महायुतीची ६५ मते फुटल्याचे निकालातून उघड झाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील काही घटक पक्षांची मते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर (१६९ मते) आणि अपक्ष सुशील देशमुख (५६ मते) यांच्या पारड्यात गेल्याचे उघडपणे बोलले जात आहे. पहिल्या पसंतीची मते मिळाल्याने सईद खान विजयी तर झाले, मात्र मित्रपक्षांनी ऐनवेळी केलेल्या या दगाफटक्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

“देव माझ्या पाठीशी होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे मी ही जागा जिंकू शकलो. निवडणुकीची सगळी रणनीती चोख आखली असतानाही अंतर्गत पातळीवर विरोध झाला. या गद्दारीचा संपूर्ण अहवाल मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असून, तेच यावर योग्य तो अंतिम निर्णय घेतील.”
सईद खान, नवनिर्वाचित आमदार, शिवसेना

विजयोत्सवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सईद खान यांनी आपला संताप व्यक्त केला. भाषणादरम्यान संतप्त समर्थकांनी थेट राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे नाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र खान यांनी संयम राखत कार्यकर्त्यांना शांत केले. पण, “पुढे जेव्हा तुमच्यावर अशीच वेळ येईल, तेव्हा व्याजासकट हिशेब पूर्ण केला जाईल,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला सुनावले. विधान परिषदेच्या या रणसंग्रामात सईद खान यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न फसला असला, तरी या अंतर्गत बंडाळीमुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी काळात जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असा उघड संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ