जेन झी पिढीला आधुनिक विचारसरणी, डिजिटल जीवनशैली आणि सतत बदलणारे ट्रेंड यासाठी ओळखले जाते. मात्र फॅशनच्या बाबतीत ही पिढी केवळ नवीनतेच्या मागे धावत नसून जुन्या शैलींनाही आधुनिक स्पर्श देत स्वीकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आरामदायी कपडे आणि आकर्षक लूक यांचा समतोल साधणाऱ्या फॅशनकडे तरुणांचा कल वाढताना दिसत आहे.
दैनंदिन जीवनात ओव्हरसाईज टी-शर्ट, सैल शर्ट आणि बॅगी कपडे पसंत करणारी जेन झी पिढी सण, उत्सव आणि लग्नसमारंभांसारख्या खास प्रसंगी मात्र पारंपरिक फॅशनकडे वळताना दिसते. पलाझो पॅंट, शरारा, सैल पायजमे आणि हलक्या रंगांचे कुर्ते यांसारखे पारंपरिक पेहराव पुन्हा एकदा लोकप्रिय झाले आहेत. साधेपणातही स्टाईल दाखवणारे हे कपडे तरुणांमध्ये विशेष पसंती मिळवत आहेत.
तरुणींमध्ये दुपट्ट्याचा वापर केवळ पारंपरिक पोशाखापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता फॅशन स्टेटमेंटचा भाग बनला आहे. कुर्त्यासोबत, ड्रेसवर स्कार्फ म्हणून किंवा आधुनिक पोशाखांमध्ये लेयरिंगसाठी दुपट्ट्याचा वापर केला जात आहे. विशेषतः हलक्या सिल्क फॅब्रिकचे दुपट्टे अधिक लोकप्रिय ठरत आहेत.
ज्वेलरीच्या बाबतीतही जुन्या ट्रेंडचे पुनरागमन झाले आहे. मेटलच्या बांगड्या, काचेच्या बांगड्या आणि पारंपरिक कडे यांना पुन्हा मागणी वाढली आहे. हे दागिने वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारच्या पोशाखांवर सहज शोभून दिसतात.
याशिवाय 2000 च्या दशकातील मेश टॉप, ब्रालेट आणि कैमीसोल यांसारख्या स्टाईल्सही पुन्हा चर्चेत आल्या आहेत. यासोबतच चंकी इअररिंग्ज, लेयर्ड नेकलेस, स्टेटमेंट रिंग्ज आणि ओव्हरसाईज्ड कफ्स यांसारख्या बोल्ड अॅक्सेसरीज जेन झीच्या फॅशनचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. जुन्या आणि नव्या ट्रेंडचा सुंदर संगम साधत ही पिढी स्वतःची वेगळी फॅशन ओळख निर्माण करताना दिसत आहे.




