“आम्ही आधी लोकांकडे गेलो अन् नंतर पक्ष काढला”; भाषणाच्या शेवटी केलेल्या ‘त्या’ नाट्यमय कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि सुपरस्टार सी. जोसेफ विजय (थलपती विजय) हे सध्या त्यांच्या विधानसभेतील एका धडाकेबाज भाषणामुळे आणि अनोख्या शैलीमुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आले आहेत. राजकारणात येताच आपल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. त्यांचे भाषण संपताना त्यांनी सभागृहात केलेल्या एका खास ‘सिनेमॅटिक’ कृतीवर आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर दुसरीकडे या भाषणाची क्लिप व्हायरल होताच नेटकऱ्यांनी ‘विजय अण्णांनी थेट विधानसभेतच चित्रपटाचा क्लायमॅक्स दाखवला’ अशा मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ने या संदर्भातील व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर पोस्ट केल्यानंतर त्यावर सोशल मीडिया युजर्स तुटून पडले आहेत.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री विजय यांनी, ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या त्यांच्या पक्षाला केवळ ‘अभिनेत्यांचा पक्ष’ म्हणून हिणवणाऱ्या टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. चित्रपटाच्या सेटवरून थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याच्या आरोपांना उत्तर देताना ते आपल्या खास शैलीत म्हणाले, “काही लोक म्हणतात मी थेट शूटिंगच्या सेटवरून मुख्यमंत्री बनलो. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, ही केवळ एक ‘रील’ (अफवा) कथा आहे. आमची पाळेमुळे लोकांशी जोडलेली आहेत.” नेहमीच्या राजकीय पक्षांप्रमाणे आधी संघटना उभी करून मग लोकांकडे जाण्याऐवजी, आपण आधी वर्षानुवर्षे लोकांमध्ये काम केले आणि त्यानंतरच ‘टीव्हीके’ पक्षाची स्थापना केली, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आघाडीशिवाय स्वबळावर ही निवडणूक जिंकल्याची आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली.
या महत्त्वपूर्ण भाषणादरम्यान विजय यांनी करूरमधील दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेचा उल्लेख करत, अशा दुर्घटनांचे राजकारण करून त्यांच्या पक्षावर दोषारोप ठेवणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण थेट राजकारणात आलो नसून २०११ ची कोळी बांधवांच्या समर्थनाची जाहीर सभा, जलीकट्टू आंदोलन, स्टरलाइट आंदोलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना दिलेली मदत या समाजकार्यातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) आपल्या पक्षाने आधीच विरोध दर्शवला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांची रीतसर परवानगी घेतली आणि त्यानंतर विरोधकांच्या वॉकआऊटवर (सभागृह सोडण्यावर) थेट एका चित्रपटातील हिरोसारखी नाट्यमय हाताची खूण (जेस्चर) करत विरोधकांना निरुत्तर केले. त्यांची हीच रीयल लाईफमधील सिनेमॅटिक स्टाईल सध्या संपूर्ण देशात कौतुकाचा विषय ठरत आहे.




