पीडितेचा आक्रोश ऐकून धावलेल्या शेजाऱ्यांमुळे टळला अनर्थ; कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळावरूनच ठोकल्या बेड्या.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. आजोबांच्या वयाच्या दोन वृद्ध नराधमांनी एका १५ वर्षांच्या अत्यंत गरीब, कचरावेचक अल्पवयीन मुलीला फूस लावून बंद घरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने पाशवी लैंगिक अत्याचार केले. या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडित मुलीने केलेल्या आक्रोशानंतर आजूबाजूच्या सतर्क नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केल्यामुळे या निष्पाप मुलीची सुटका झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना थेट गुन्ह्याच्या ठिकाणाहूनच रंगेहाथ ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे वय साधारण ६० वर्षे आहे. अख्तर मणियार (वय ५९) आणि सलीम शेख (वय ६५) अशी या संशयित नराधमांची नावे आहेत. आरोपी अख्तर मणियार हा कल्याण एपीएमसी (APMC) मार्केट परिसरात चहा विकण्याचा व्यवसाय करतो, तर सलीम शेख हा रिक्षाचालक आहे. मणियार हा कोळसेवाडी परिसरात एका घरात एकटाच भाड्याने राहत होता आणि तो नेहमी रात्रीच्या वेळी विविध महिला व मुलींना या घरात आणत असे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघे या १५ वर्षांच्या मुलीला फूस लावून घरात घेऊन आले आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार सुरू केला. या नराधमांच्या तावडीत सापडलेल्या मुलीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रचंड आरडाओरडा आणि रडण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या शांततेत मुलीचा हा विदारक आक्रोश ऐकून आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना संशय आला. नागरिकांनी तात्काळ घराकडे धाव घेतली आणि कोळसेवाडी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद घराचा दरवाजा उघडला. त्या वेळी आतमध्ये जे दृश्य दिसले ते अत्यंत भयावह होते; संपूर्ण घरात रक्ताचे डाग पसरले होते. पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीची नराधमांच्या तावडीतून सुटका केली आणि दोन्ही आरोपींना जागेवरच बेड्या ठोकल्या.
या अत्यंत संवेदनशील घटनेनंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO Act) कडक गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा गंभीर घटनांच्या विरोधात स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह इतर राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नराधमांना फाशीची किंवा कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, कल्याण-डोंबिवलीच्या संस्कृतीला कलंक लावणाऱ्या अशा गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली जात आहे.




