विजयानंतर गोकुळ गीतेंनी मागितली मुख्यमंत्री शिंदेंची माफी; शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवेशाच्या ऑफरवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया.
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का देत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या अनपेक्षित निकालामुळे महायुतीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोकुळ गीते यांनी मतदारांचे आभार मानले, मात्र त्याच वेळी एक धक्कादायक विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागितली.
गोकुळ गीते म्हणाले की, “या मतदारसंघाचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. लोकांना या पदासाठी एक ‘फिट’ उमेदवार हवा होता, जो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि त्यांनी ‘अनफिट’ उमेदवाराला नाकारले.” आपल्या माफीनाम्याबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन मी माझा प्रचार थांबवला होता आणि घरातच बसलो होतो. परंतु, माझ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांचे ऐकले नाही आणि माझ्यासाठी रात्रीचा दिवस करून हा विजय खेचून आणला. पक्षादेश डावलून कार्यकर्त्यांनी केलेल्या या कामाबद्दल मी नेत्यांची माफी मागतो, पण मला विजयी करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा मी ऋणी आहे.”
दरम्यान, पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपला विश्वासघात झाल्याचा आरोप करत सर्व नेते खोटारडे असल्याची तीव्र भावना व्यक्त केली होती. यावर गीतेंनी अधिक बोलणे टाळत “ते त्यांचे उत्तर स्वतःच देतील,” असे म्हणत हा विषय संपवला. दुसरीकडे, निकाल लागताच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी गीतेंचे विश्वासू सहकारी नाना गामने यांना फोन करून गोकुळ गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या आगामी राजकीय भूमिकेविषयी विचारले असता, गीतेंनी सावध पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेणार नाही, असे सांगत त्यांनी सध्या तरी शिवसेनेतील प्रवेशावर थेट बोलणे टाळले आहे.




