खासदार ओमराजे निंबाळकरांची उघड नाराजी; लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून पुराव्यांचा मोठा धमाका होण्याची चिन्हं
शिवसेना (UBT) अर्थात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील ६ खासदारांचा एक स्वतंत्र गट तयार झाल्याचे आणि या संदर्भातील ठोस पुरावे आज संध्याकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून जाहीर केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. हे सर्व बंडखोर खासदार पुढील दोन ते तीन दिवसांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख करत थेट पक्ष नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते ठाकरे गटात थांबण्याची शक्यता धुसर मानली जात असून, आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडूनही मोठा राजकीय धमाका होऊ शकतो.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र या सर्व घडामोडींवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “तांत्रिकदृष्ट्या हे सर्व ६ खासदार अजूनही आमच्याच पक्षात आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून किंवा शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही,” असा दावा राऊतांनी केला आहे. तसेच, ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यात काहीही गैर नसल्याचे सांगत पक्षाकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, दिल्लीत या संपूर्ण नाटकाची जणू रंगीत तालीम पूर्ण झाली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाची अधिकृत कागदपत्रे समोर आल्यास संजय राऊतांच्या दाव्यांमधील हवा निघून जाईल, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.




