“एकनाथ शिंदे ही शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’…”; खासदार फोडाफोडीवरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसमधील (TMC) खासदार फोडण्यामागे अमित शाह यांचाच हात असून, हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी सुरू असलेले मोठे षडयंत्र आहे, असा दावा राऊतांनी केला आहे. “उद्या अमित शाह हे स्वतः मोदींविरोधात बंड पुकारू शकतात आणि याच मोठ्या कारस्थानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा एक भाग आहेत,” असे सांगत राऊतांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “अमित शाह हे मुळात व्यापारी आहेत. शेअर बाजारात पैसे गुंतवणे आणि कृत्रिम भाव वाढवून नफा कमावणे हाच त्यांचा खरा व्यवसाय आहे; सहकार क्षेत्र केवळ एक ढोंग आहे. त्यांनी देशात अराजकता निर्माण करण्याची जणू सुपारीच घेतली आहे.” पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख ‘अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी’ असा केला. “गेल्या चार वर्षांत सर्वोच्च न्यायालय केवळ दबावामुळे निर्णय घेऊ शकले नाही आणि याच दबावातून निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह बहाल केले. जर शाहांना वाटते की हीच खरी शिवसेना आहे, तर त्यांनी न्यायालयात येऊन तसे सिद्ध करावे, कारण खरी शिवसेना फक्त ठाकरांचीच आहे,” असे थेट आव्हान राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिले आहे.




