पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला शिरगाव समुद्रकिनारा सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. समुद्राच्या उधाणासोबत मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या प्लास्टिक कचर्यामुळे संपूर्ण किनारा अक्षरशः झाकला गेला असून, एकेकाळी निसर्गरम्य आणि स्वच्छतेसाठी ओळखला जाणारा हा समुद्रकिनारा आता कचर्याच्या ढिगार्यांनी विद्रूप झाला आहे. हजारो प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आणि इतर टाकाऊ वस्तूंनी किनाऱ्यावरील वाळू व्यापली असून, त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्या, खाड्या आणि शहरी भागांतून समुद्रात मिसळलेला कचरा लाटांसोबत पुन्हा किनाऱ्यावर परत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वडराई ते शिरगाव या विस्तीर्ण किनारपट्टीवर प्लास्टिकचा जाड थर साचला असून, अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम पर्यटनावर होत असून, समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील वाढते प्लास्टिक प्रदूषण केवळ किनाऱ्यापुरते मर्यादित नसून सागरी जीवसृष्टीसाठीही मोठा धोका निर्माण करत आहे. प्लास्टिकचे सूक्ष्म कण म्हणजेच नॅनोप्लास्टिक्स समुद्री जीवांच्या शरीरात प्रवेश करत असून, त्याचा परिणाम अखेरीस मानवी अन्नसाखळीवरही होत आहे. माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिरगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम वेगाने सुरू केली आहे. विशेष बीच क्लिनिंग मशीनच्या मदतीने किनाऱ्यावरील कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, समुद्रकिनाऱ्याचे मूळ सौंदर्य पुन्हा बहाल करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, प्लास्टिक प्रदूषणाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी जनजागृती, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक सवयींची अंमलबजावणी तितकीच आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




