रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा नचिकेत लेले आता मनोरंजन क्षेत्रात नवी इनिंग सुरू करत आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स आणि मयुरा प्रधान यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या आगामी ‘तुला पाहता’ या चित्रपटातून तो पहिल्यांदाच अभिनेता तसेच पार्श्वगायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट १० जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून त्याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘तुला पाहता’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयुरा प्रधान यांनी केले असून छायांकनाची जबाबदारी पुष्कर झोटिंग यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन रोहित प्रधान यांनी, तर संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले या जोडीने केले आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी दीपाली विचारे यांनी पार पाडली आहे. या चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे यांसह नचिकेत लेले आणि इतर कलाकारांची दमदार स्टारकास्ट दिसणार आहे.
चित्रपटातील ‘दूर दूर’ हे गाणे अलीकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून ते प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. या गाण्यात नचिकेत लेले आणि सई गोडबोले यांचा मधुर आवाज आहे, तर संगीतकार रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे रोहन गोखले यांनी या गाण्याचे लेखन करत गीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे.
या संपूर्ण प्रकल्पाबद्दल बोलताना नचिकेत लेले यांनी ‘तुला पाहता’ हा चित्रपट माझ्या करिअरमधील एक भाग्यवान टप्पा असल्याचे सांगितले. पहिल्याच चित्रपटात मुख्य भूमिका आणि पार्श्वगायनाची संधी मिळणे ही मोठी गोष्ट असून त्याबद्दल त्यांनी मयुरा प्रधान यांचे आभार मानले आहेत. आता त्यांच्या या नव्या प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.




