बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका स्वीटमार्टमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा मैदा एका तरुणाकडून पायाने तुडवला जात असल्याचे दिसत असून, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्वीटमार्टमध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मैदा पायाने मळला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आस्थापनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) या प्रकरणाची दखल घेऊन तपास करणार का, आणि दोषींवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, खाद्यपदार्थ निर्मितीत स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




