गोरेगाव येथील मनिषा गायकवाड यांच्या आत्महत्येप्रकरणी महिनाभराने गुन्हा दाखल; प्रेयसीसोबत राहण्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या प्रदीप गायकवाडला पोलीस कोठडी.
मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे (Extramarital Affair) सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास लावून आपले जीवन संपवले. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी घटनेच्या एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपी पती प्रदीप रघुनाथ गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत. मनीषा प्रदीप गायकवाड असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. आरोपी प्रदीपवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (Abetment to Suicide) गंभीर आरोप असून, बोरिवली स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत मनिषा आणि प्रदीप यांचा विवाह २०१७ मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली आणि ते गोरेगाव येथील कोयनानगर परिसरातील साईबाबा चाळीत राहत होते. मात्र, विवाहानंतर काही वर्षांतच प्रदीपचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू झाले. या संबंधांची कुणकुण मनिषाला लागताच तिने पतीला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावरून प्रदीपने मनिषाला किरकोळ कारणांवरून मारहाण करणे आणि अमानुष मानसिक छळ करणे सुरू केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पतीने दिलेल्या त्रासाची कल्पना मनिषाने आपल्या आजीला दिली होती, मात्र संसाराचा विचार करून तिने ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवून ठेवायला सांगितली होती.
१७ मे २०२६ रोजी मनिषा आणि प्रदीप यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता. या आनंदाच्या दिवशीही प्रदीपने मनिषासोबत विनाकारण वाद उकरून काढत तिला बेदम मारहाण केली. या असह्य त्रासामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून मनिषाने त्याच रात्री साडेनऊ वाजता राहत्या घरी गळफास घेतला.
मनिषाच्या निधनानंतरही आरोपी पती प्रदीपच्या वागण्यात कोणताही पश्चाताप दिसत नव्हता, तो नेहमीप्रमाणे मजेत राहत होता. त्याच्या या संशयास्पद वागणुकीमुळे मनिषाच्या पालकांना संशय आला. त्यांनी गोरेगावमधील स्थानिक रहिवासी आणि मनिषाच्या आजीकडे चौकशी केली असता, प्रदीपच्या छळाची आणि अनैतिक संबंधांची सर्व हकीकत समोर आली. प्रदीपला त्याच्या प्रेयसीसोबत राहायचे होते, म्हणूनच तो मनिषाचा काटा काढण्यासाठी तिचा छळ करत असल्याचे उघड झाले.
या धक्कादायक खुलाशानंतर मनिषाच्या आईने तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन जावयाविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी प्रदीप गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या प्रदीपची पोलीस कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




