मॅडॉक फिल्म्स आणि लक्ष्मण उतेकर यांचा नवा धमाका; प्रसिद्ध तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षाची गाथा ‘ईठा’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘स्त्री २’ च्या ऐतिहासिक यशानंतर आता ती थेट एका मराठी लावणी सम्राज्ञीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन आणि ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर सध्या थिएटरमध्ये दाखवला जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या टीझरचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, श्रद्धा कपूरचा अभिनय पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरने महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
‘ईठा’ हा चित्रपट म्हणजे एक भव्य बायोपिक ड्रामा असून, यात विठाबाईंचा १९४० ते १९९० या पाच दशकांतील अत्यंत खडतर आणि संघर्षाने भरलेला जीवनप्रवास दाखवला जाणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रद्धा कपूर एका गरोदर लावणी कलाकाराच्या रूपात दिसत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या एका दृश्यात, स्टेजवर लावणी सादर करत असतानाच विठाबाईंना प्रसूती कळा येऊ लागतात. अशा असह्य वेदनेतही कलेचा अपमान होऊ नये म्हणून त्या सादरीकरण सुरूच ठेवतात. त्यानंतर थेट स्टेजच्या मागे जाऊन त्या बाळाला जन्म देतात आणि कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय एका दगडाने स्वतःच बाळाची नाळ कापतात. जन्मानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्या पुन्हा पायात घुंगरू बांधून स्टेजवर उभ्या राहतात, हा विठाबाईंच्या आयुष्यातील खराखुरा आणि थक्क करणारा प्रसंग या सिनेमात जिवंत करण्यात आला आहे.
हा बहुचर्चित चित्रपट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत २८ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच रणदीप हुडा, मोहम्मद झीशान अयुब आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे कसलेले कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता लहान वयातच तमाशाच्या फडात उतरलेल्या आणि कलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांची ही शौर्यगाथा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल, यात शंका नाही.




