विरोधी पक्षांमधील खासदारांच्या फोडाफोडीमागे देशाची लोकशाही संपवण्याचा दिल्लीचा कट असल्याचा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांचा थेट आरोप.
देशभरात सध्या वेगवेगळ्या पक्षांचे खासदार फोडण्याचे राजकारण वेगाने सुरू असून, या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक नवा आणि खळबळजनक दावा केला आहे. नारीशक्ती आणि डीलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करण्यासाठी ही फोडाफोडी सुरू असल्याचे तर्क त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. केवळ संसदेतील नंबर गेम वाढवून आपल्या प्रादेशिक अस्मितेचा बळी आम्ही देऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केली. “उद्या अमित शाह सत्तेत नसतील, ते काही अमर होऊन किंवा संजीवनी बुटी खाऊन जन्माला आलेले नाहीत,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे की, भाजपला आगामी काळात मोठी भीती सतावत असून, २०२९ पर्यंत देशात काँग्रेससोबत कोणताही प्रादेशिक पक्ष जिवंत राहू नये, अशी त्यांची रणनीती आहे. जवळपास ८५० खासदारांचे संख्याबळ गोळा करून भाजपला देशाच्या संविधानात थेट बदल करायचा आहे. संविधान बदलून देशातील लोकशाही कायमची संपवणे, अध्यक्षीय शासन पद्धत लागू करणे आणि देशात हुकूमशाही (तानाशाही) आणणे हाच या खासदार फोडाफोडीमागचा खरा हेतू असल्याचा मोठा ‘बॉम्ब’ त्यांनी टाकला आहे. मात्र, विरोधी पक्ष भाजपचा हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संघर्षात राहुल गांधी हे देशाचे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडे आव्हान देत असल्याचे राऊतांनी अधोरेखित केले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २०२९ मध्ये देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, हीच भीती मोदी-शाहांच्या मनात असल्याने ते प्रादेशिक पक्ष फोडण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी उपरोधिक टोला लगावला. “मोदी आणि ट्रम्प यांच्यात बैठक झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचेही खासदार फोडतील, त्यामुळे तुमचे सरकार सांभाळा, असा सल्ला मोदी ट्रम्प यांना देत आहेत,” अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.




