spot_img

Chief Election Officer : मतदार याद्यांमधील गोंधळावर विरोधकांचा दबाव; निवडणूक आयोगाची तातडीने कारवाई

spot_img

महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील अनियमिततांवरून महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर दबाव वाढवल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) यांनी तातडीने पावले उचलली. गुरुवारी त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्यांमधील त्रुटींची चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर अवघ्या काही तासांत जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले, ज्यावर आधारित चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला तपशीलवार आणि वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला. विरोधी पक्षांनी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Vaghmare) आणि चोक्कलिंगम यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी नोंदवल्या होत्या. यामुळे मतदार याद्यांमधील गोंधळावर कारवाईसाठी निवडणूक आयोगाला पावले उचलावी लागली, जे विरोधी पक्षांचे मोठे यश मानले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत मतदारांची नावे दुबार असल्याचा आणि मतचोरीचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने एकत्र येत निवडणूक अधिकाऱ्यांना पुरावे सादर केले. चोक्कलिंगम यांनी 24 तासांतच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश दिले. सध्या विधानसभा मतदारसंघांच्या याद्यांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन सुधारणा सुरू असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने दिली.

नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता (Shushma Gupta) यांचे नाव अनेकदा नोंदले गेल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. याबाबत पालघर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी प्रपत्र 7 भरून घेतले आणि 19 ऑगस्ट 2025 रोजी दुबार नावे हटवली. याचा अर्थ, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुषमा गुप्ता यांची नावे अनेकदा मतदार यादीत होती. दहिसर मतदारसंघात जयश्री मेहता यांचे नावही एकापेक्षा जास्त वेळा नोंदले गेले होते, जे 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025 रोजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे हटवण्यात आले. तसेच, भांडुप पश्चिम आणि विक्रोळी मतदारसंघात मोहन नंदा बिलवा यांचे नाव अनुक्रमे 15 एप्रिल 2025 आणि 9 एप्रिल 2025 रोजी हटवले गेले.नाशिक मध्य मतदारसंघात एकाच घरात 800 हून अधिक मतदार नोंदल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. चौकशीत असे समजले की, घर क्रमांक 3892 हा 1500 चौरस मीटर क्षेत्राचा आहे आणि तिथे 700 घरे आहेत, परंतु सर्वांना एकच घर क्रमांक आहे. अमरावतीच्या वडनेरा मतदारसंघात 450 मतदारांचे घर क्रमांक ‘0’ असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, यशोदा नगर आणि उत्तम नगर परिसरातील झोपडपट्टींना महापालिकेने घर क्रमांक दिलेले नाहीत, त्यामुळे ही त्रुटी निर्माण झाली.“विरोधी पक्षांनी दुबार आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदलेल्या मतदारांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर केला, ज्यावर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला तथ्याधारित अहवाल पाठवला आहे,” असे चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाने सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ