महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, भाजपाला (BJP) सगळंच हवंय सत्ता, जमीन आणि आता महापालिकाही. त्यांनी थेट अदानी-अंबानींवर निशाणा साधत म्हटलं की, देशातील प्रत्येक मोठं काम अदानींकडे सोपवलं जातंय. काही मराठी माणसं दलाल बनून त्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला स्पष्ट शब्दांत सुनावलं, “जोपर्यंत मतदान यादीतील घोळ स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नका.” त्यांनी मनसेच्या यादी प्रमुखांना आदेश दिले की, सर्व मतदान याद्या तपासा आणि कुठे गडबड झालीय हे शोधून काढा.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा मुद्दा लावून धरावा, असंही ते म्हणाले. त्यांनी पुढे स्फोटक दावा केला की, अदानी आणि अंबानींसाठी शहरं आंदण म्हणून दिली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं ऑपरेशन कमी करून सगळं नवी मुंबईला हलवण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपाला मत देणाऱ्या मराठी माणसांनो, जेव्हा गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा तुम्हालाही मराठी म्हणूनच डावललं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.राज ठाकरे यांनी सांगितलं की, दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे, जिथे पुढील रणनीती जाहीर होईल. “जोपर्यंत मतदान यादीतील घोटाळे उघड होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.




