JunnarAccident : नगर-कल्याण हायवेवर काळजाचा थरकाप! ट्रक अन् बाईकच्या समोरासमोर धडकेत जुन्नरमधील दोन तरुण जागीच ठार!

spot_img

शनिवारी मध्यरात्री डुंबरवाडी शिवारात घडला भीषण अपघात; २१ आणि २२ वर्षीय तरुणांच्या अकाली निधनाने ओतूर आणि डिंगोरे परिसरावर शोककळा

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर शनिवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी गावच्या हद्दीत एक भरधाव कंटेनर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीररीत्या चिरडले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २१ आणि २२ वर्षांच्या दोन उमद्या तरुणांचा या अपघातात अकाली अंत झाल्याने जुन्नर तालुक्यासह ओतूर आणि डिंगोरे परिसरामध्ये सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव नितीन डुंबरे (वय २२, रा. ओतूर, ता. जुन्नर) आणि गणेश विजय गाडेकर (वय २१, रा. डिंगोरे, ता. जुन्नर) अशी अपघातात जीव गमावलेल्या दोन्ही दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. शनिवारी (१३ जून) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास हे दोघे तरुण आपल्या दुचाकीने (क्र. MH 12 XL 1380) आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने चालले होते. दरम्यान, ते डुंबरवाडी गावच्या हद्दीतील ‘किगा आईस्क्रीम’ पार्लरच्या समोर पोहोचले असता, कल्याणकडून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अशोक लेलँड कंटेनर ट्रकने (क्र. MH 46 DC 2451) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, दोन्ही तरुणांना रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही, त्यांचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

या प्रकरणी ओतूर पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक गणेश बाबासाहेब शिंदे (वय ३७, रा. हिवेसिंगा, जि. बीड) याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी या अपघाताचे वृत्त ओतूर आणि डिंगोरे गावात पोहोचताच दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन घरातील कर्ते आणि तरुण मुले गमावल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती, संपूर्ण परिसरात सध्या अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ