IranUSConflict : ५०० किलो समृद्ध युरेनियम गुप्त बोगद्यात गाडले; शांतता कराराच्या तोंडावर ट्रम्प प्रशासनाचा रक्तदाब वाढला!

spot_img

“साठ्याच्या प्रवेशद्वारावरच पेरली स्फोटकांची माळ”; अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या दाव्याने जगात खळबळ, युद्धाचे ढग गडद

इराणकडील ५०० किलो अत्यंत संवेदनशील आणि समृद्ध (Enriched) युरेनियमचा साठा आपल्या ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने सर्व शक्ती पणाला लावली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायल आणि अमेरिकेने विविध मार्ग अवलंबून इराणला जेरीस आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. आता कुठे दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे शांतता कराराची चर्चा सुरू झाली असतानाच, एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वोच्च महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या हाताला इराणचा हा युरेनियम साठा लागणे आता अशक्य मानले जात आहे. इराणने हा अण्वस्त्रांसाठी उपयुक्त असणारा साठा नेमका कुठे दडवला? याबाबत अमेरिकेच्या बलाढ्य गुप्तहेर खात्याने (CIA) एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामुळे शांतता करार झाला तरी अमेरिकेच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम राहणार आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, इराणने अत्यंत चाणाक्षपणे गेल्या काही आठवड्यांत बॉम्ब आणि घातक स्फोटके तयार करण्यासाठी योग्य असलेला युरेनियमचा मोठा साठा एका अत्यंत गोपनीय ठिकाणी हलवला आहे. इराणच्या एका दुर्गम प्रांतात जमिनीच्या शेकडो फूट खाली भूमिगत बोगद्यांचे (Underground Tunnels) एक अथांग आणि दाट जाळे पसरलेले आहे. इराणने हे ५०० किलो युरेनियम थेट या बोगद्यांच्या पोटात कायमचे गाडून टाकले आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करू नये म्हणून या साठ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संपूर्ण परिसरात शक्तिशाली स्फोटकांची माळ (Booby Traps) पेरून ठेवली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युरेनियम कोणत्याही परिस्थितीत जप्त करण्याचे कडक आदेश दिले होते, मात्र इराणच्या या आत्मघातकी बचावामुळे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीचा किचकट बनला आहे.

इराणच्या या नवीन खेळीमुळे ट्रम्प प्रशासनाची पूर्ण कोंडी झाली असून त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. परिणामी, आता प्रस्तावित शांतता करार पुढे सरकणार की नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जोपर्यंत इराण आपल्या ताब्यातील युरेनियमचा साठा अमेरिका, रशिया आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) स्वाधीन करत नाही, तोपर्यंत कोणताही करार अंतिम होणार नाही,” अशी आक्रमक आणि ठाम भूमिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. वास्तविक पाहता, आधी ठरलेल्या एका मसुद्यानुसार हे ५०० किलो युरेनियम इराणमध्येच नष्ट केले जाणार होते आणि उर्वरित साठा देशाबाहेर हलवण्यात येणार होता. मात्र, करार अंतिम टप्प्यात येताच इराणने हे बोगदे कायमचे बंद करून तिथे जाणे अत्यंत धोकादायक बनवले आहे.

सध्या या बोगद्यांच्या परिसरात इराणने केलेल्या सुरुंग पेरणीमुळे तिथे कोणतीही लष्करी किंवा तांत्रिक कारवाई करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. इराणने निर्माण केलेल्या या अभेद्य चक्रव्यूहामुळे अमेरिका आता बॅकफूटवर आली आहे. या शस्त्रसंधीच्या वाटाघाटींमधून शेवटी अमेरिकेच्या पदरात काय पडते आणि इराणने दिलेल्या या धोक्याचा बदला घेण्यासाठी ट्रम्प एखादे नवे जाचक कलम लादून इराणवर थेट लष्करी हल्ला चढवण्याचा आदेश देतात का, याकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ