Riteish Deshmukh : “विजय यांच्याएवढी माझीही समज आहे!”; थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रितेश देशमुखचे राजकारणावरील मोठे विधान

spot_img

“मी राजकारणात आलो तर तुम्हीच म्हणणार एका घरात किती…”; रितेशने कौटुंबिक घराणेशाहीवर दिली रोखठोक प्रतिक्रिया

बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अष्टपैलू अभिनयाने गाजवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीसोबतच ‘बिग बॉस मराठी’चे यशस्वी सूत्रसंचालन करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रितेशला मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचे दिवंगत वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते होते, तर त्याचे दोन्ही सख्खे भाऊ (अमित देशमुख आणि धिरज देशमुख) सध्या सक्रिय राजकारणात आहेत. स्वतः रितेश आपल्या भावांच्या प्रचारासाठी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरतो आणि त्याच्या अफाट लोकप्रियतेमुळे त्याला पाहण्यासाठी लातूरसह महाराष्ट्रात मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर, रितेश देशमुख स्वतः कधी राजकारणात प्रवेश करणार? हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.

नुकतीच तामिळनाडूच्या राजकारणात एक अभूतपूर्व घटना घडली. दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलपती विजय’ याने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करून विधानसभेत थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली. विजयने अगदी सामान्य लोकांना तिकिटे देऊन निवडून आणत सत्ता स्थापन केली. याच ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देत एका कार्यक्रमात रितेश देशमुखला त्याच्या राजकीय प्रवासाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. “तामिळनाडूमध्ये थलपती विजय मुख्यमंत्री झाले. तिथे कलाकार राजकारणात यशस्वी होतात. तुमचीही राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे आणि लोकप्रियताही अफाट आहे, मग तामिळनाडूचा हा पॅटर्न पाहून तुम्हाला कधी राजकारणात यावेसे वाटले नाही का?” असा सवाल रितेशला विचारला गेला.

यावर रितेश देशमुखने अत्यंत हजरजबाबी आणि जबरदस्त उत्तर दिले. तो म्हणाला, “जेवढी समज विजय यांना त्यांच्या प्रसिद्धीची आहे, तेवढीच मला देखील माझी आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात असा कोणताही प्रयोग करणार नाही.” त्यावर निवेदकाने खोचकपणे विचारले, “असं का? तुम्हाला राजकारणाचा कंटाळा आला आहे का?” यावर रितेशने हसत अत्यंत रोखठोक उत्तर दिले, “मी जर राजकारणात आलो ना, तर उद्या तुम्हीच (माध्यमं आणि लोक) बोलणार की एकाच घरातले किती लोक राजकारणात घुसत आहेत!” रितेशने घराणेशाहीच्या आरोपांना आणि स्वतःच्या राजकीय प्रवेशाला अत्यंत चतुराईने पूर्णविराम दिला असून, त्याच्या या विधानाची सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ