राज्यातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून तीव्र उष्णता आणि वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झाले असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. दक्षिण कोकणात मान्सूनने प्रवेश केला असला तरी त्याची पुढील वाटचाल अपेक्षेपेक्षा संथ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत असून किमान 15 जूनपर्यंत राज्यभर समाधानकारक आणि व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने शेतकऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. पेरणीसाठी आवश्यक असा सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाऊस अद्याप अपेक्षित नसल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी सुरू करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. मात्र हा पाऊस मर्यादित स्वरूपाचा असल्याने शेतीच्या कामांसाठी तो पुरेसा ठरणार नाही.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. 12 जूनपर्यंत कमाल तापमानात विशेष घट होण्याची चिन्हे नसून विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागानेही शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. वादळी पाऊस किंवा विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत उपकरणांच्या जवळ थांबणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश भागांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.




