महायुतीच्या ‘संकटमोचकां’चे प्रयत्न अपयशी; थेट गाठीभेटी टाळून बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली असून पक्षाने येथे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीमध्ये ही जागा खेचून आणण्यासाठी आधीपासूनच आग्रही असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. भाजप नेते गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोन्ही बंधूंनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील गणेश गीते यांची मनधरणी करण्यात भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांना यश आले असून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे.
या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी आणि गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुंबईहून विशेष विमानाने मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या जोडीला संकटमोचक गिरीश महाजन देखील दिवसभर नाशिकमध्ये तळ ठोकून होते. महायुतीच्या या दोन्ही वजनदार मंत्र्यांनी गोकुळ गीतेंची मनधरणी करण्याचे आटोकाट प्रयत्न केले; परंतु गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांना हुलकावणी देत थेट गाठीभेटी घेणेच टाळले. परिणामी, कोणतीही यशस्वी तडजोड न होता दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपून गेलेली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गोकुळ गीते यांचे नाव रिंगणात कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, “गोकुळ गीते यांनी आता अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना आपले जाहीर समर्थन घोषित करावे,” अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे.
गीते बंधू हे मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानतात, असा राजकीय वर्तुळात अंदाज आहे. याच विश्वासाच्या जोरावर तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन पुन्हा एकदा नाशिक मुक्कामी आले आहेत, तर मंत्री उदय सामंत देखील पुन्हा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. आता प्रत्यक्ष मतदानाच्या तोंडावर भाजपचे हे बंडखोर नेते शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतात की लढत कायम ठेवतात, यावर नरेंद्र दराडे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.




