उरुळी कांचन कनेक्शन उघड; शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या तांडवाने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या प्रकरणामागील धक्कादायक आणि थरारक मोडस ऑपेरांडा (Modus Operandi) आता समोर आला आहे. प्राथमिक तपासानुसार, उरुळी कांचन येथील राधेशाम प्रजापती (वय ३५) हा दारू तयार करण्याचे काम करत होता. त्याच्याकडून सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे (वय २३) हा दारू विकत घ्यायचा आणि ती वेगवेगळ्या गुत्त्यांवर पुरवायचा. मात्र, यंदा केवळ अधिक नफा कमावण्याच्या अमानुष हव्यासापोटी वानखेडेने दारूचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी त्यात ‘मिथेनॉल’ हे घातक रसायन मिसळले. हे केमिकल नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मिसळले गेल्याने ती दारू अत्यंत विषारी आणि जीवघेणी ठरली.
वानखेडेने हा मृत्यूचा साठा पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत बेकायदेशीर गुत्ता चालवणाऱ्या कर्नेल सिंह विरका आणि गुरमित सिंह विरका या बापलेकांना विकला, जो अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. याशिवाय, त्याने पुण्याच्या खडकीतील कल्पेश अग्रवाल, वडारवाडीतील अरिहंत धोत्रे, तसेच हडपसर आणि काळेपडळ भागातील गुत्ता चालक आकाश जाधव व अशोक हांडे यांनाही ही विषारी दारू पुरवली. या प्राणघातक दारूमुळे आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये ८ आणि पुणे शहरात ५ अशा अधिकृत १३ ते १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर स्थानिक नागरिकांच्या मते हा आकडा याहून अधिक असण्याची भीती आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ आणि पुणे पोलिसांनी २ अशा एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, उरुळी कांचन हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने, हे भीषण कांड रोखण्यात पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणांना आलेले अपयश चव्हाट्यावर आले आहे.




