महिनाभरात १२१ कोटींचा ग्रॉस गल्ला जमा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुखने जिंकली प्रेक्षकांची मनं
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी थिएटरमध्ये धडकलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. पाचव्या आठवड्यात पदार्पण करणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. कोईमोईच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या चार आठवड्यांत म्हणजेच २८ दिवसांत भारतामधून या चित्रपटाने १०३.१५ कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. ईदच्या सुट्ट्यांमुळे चौथ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईला गती मिळाली होती, मात्र सध्या बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट देखील तुफान चालत असल्याने ‘राजा शिवाजी’च्या स्क्रीन आणि कमाईवर थोडा प्रभाव पडला आहे. असे असूनही या चित्रपटाने बजेटच्या (७५ कोटी) वर जाऊन २८ कोटींहून अधिकचा नफा कमावला आहे. रितेश देशमुखने मुख्य भूमिकेसोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि बोमन इराणी यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट ठरला आहे.




